पहिल्याच इंग्रजी पेपरला ४२ विद्यार्थ्यांनी केली कॉपी!
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील तीन हजार ३७३ परीक्षा केंद्रांवर बारावीतील जवळपास १६ लाख विद्यार्थ्यांचा पहिला इंग्रजीचा पेपर मंगळवारी (ता. ११) पार पडला. त्यात राज्य मंडळाच्या नऊपैकी सहा विभागातील ४२ विद्यार्थी पहिल्याच इंग्रजी पेपरमध्ये कॉपी करताना सापडले आहेत. त्यांच्यावर भरारी पथकांनी कारवाई केली आहे.
कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने चोख नियोजन केले आहे. प्रत्येक केंद्रावर एक बैठे पथक व प्रत्येक जिल्ह्यासाठी सात भरारी पथके नेमले आहेत. प्रत्येक परीक्षार्थीला केंद्रावर सोडताना अंगझडती घेऊनच आत सोडले जात आहे. तरीदेखील, ४२ विद्यार्थ्यांकडे कॉपी आढळली आहे. विशेष म्हणजे बैठे पथक व त्या केंद्रावरील पर्यवेक्षकांना कॉपी सापडली नाही.
पुणे विभागात सोलापूर जिल्ह्यात सात तर नगर जिल्ह्यात एका विद्यार्थ्यावर कारवाई झाली असून पुणे जिल्ह्यात इंग्रजीचा पहिला पेपर कॉपीमुक्त पार पडली आहे. छत्रपती संभाजी नगर विभागात मात्र सर्वाधिक २६ विद्यार्थी कॉपी करताना सापडले आहेत. या विभागातील जालना जिल्ह्यात सर्वाधिक कॉपी केसेस झाल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले. आता बोर्डाकडून तेथील केंद्र संचालक, पर्यवेक्षकावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विभाग कारवाई
पुणे ०८, नागपूर ०२, छ. संभाजी नगर २६, अमरावती ०२, नाशिक ०३, लातूर ०१
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊपैकी तीन विभागात इंग्रजी पेपरमध्ये एकही विद्यार्थी कॉपी करताना आढळलेला नाही. त्यात कोकण, मुंबई व कोल्हापूर हे विभाग आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी राबविलेल्या विशेष नियोजनामुळे त्या विभागातील पहिला पेपर कॉपीमुक्त पार पडला.
आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांनाही सक्त सूचना करुन परीक्षा केंद्रांना भेटी देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आगामी पेपर कॉपीमुक्त होतील, अशी आशा आहे.
बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करताना सापडलेल्या विद्यार्थ्याला चालू परीक्षा व जुलैमध्ये होणारी पुरवणी परीक्षा देता येत नाही. त्याला पुढच्या शैक्षणिक वर्षातच परीक्षेला बसता येते. कॉपी करुन आयुष्यातील एक वर्ष वाया घालविण्याऐवजी चांगला अभ्यास करावा, असे आवाहन बोर्डाने केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.