जयसिंगपूरच्या चौघांसह नऊ जणांवर सांगलीत गुन्हा
शेअर ट्रेडरचे पिस्तूलच्या धाकाने केले होते अपहरण
सांगली : खरा पंचनामा
शेअर मार्केटमध्ये बुडालेले १ कोटी ६० लाख रुपये दे, नाहीतर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत सांगलीतील शेअर ट्रेडर्सचा व्यवसाय करणाऱ्याचे पिस्तूलच्या धाकाने अपहरण करण्यात आले. याप्रकरणी जयसिंगपूर येथील चौघासह नऊ जणांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अंजूम जहांगीर लांडगे (वय ४८, ओंकार अपार्टमेंट, लक्ष्मीनारायण कॉलनी, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. फैजल डांगे, रफीक डांगे, मुज्जमिल डांगे, बबलू डांगे (रा. जयसिंगपूर) व सोहेल इनामदार, अलिम पठाण आणि अनोळखी तिघे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी अंजुम लांडगे यांचा शेअर्स ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. संशयित सोहेल इनामदार, अलिम पठाण आणि अन्य चौघांनी अंजुम यांना कोल्हापूर रस्त्यावरील ओ-नेस्ट नावाच्या हॉटेलसमोरून दि.२२ रोजी जबरदस्तीने मोटारीत बसवून पिस्तूलचा धाक दाखविला. मोटारीतून जयसिंगपूर येथील डायमंड हॉटेलच्या पाठीमागे असणाऱ्या एका खोलीत आणले. तेथे संशयित फैजल डांगे, रफीक डांगे, मुज्जमिल डांगे, बबलू डांगे यांनी फिर्यादी अंजुम यांना, आमचे बुडालेले १ कोटी ६० लाख रुपये दे, नाहीतर तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणून लाकडी दांडके आणि पिस्तुलाने मारहाण केली.
फैजल याने २५ लाख रुपयांची मागणी केली. तसेच सोहेल याने अंजुम यांच्या मोबाइलच्या माध्यमातून एक हजार रुपये आणि ३० हजार रुपयांचे यूएसडी कोणत्यातरी अकाउंटवर ट्रान्सफर केले. तसेच प्रत्येक महिन्याला एक लाख रुपये दे, नाहीतर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर संशयितांनी अंजुम यांना सांगलीत सोडून दिले. तसेच त्यांची दुचाकी जबरदस्तीने घेऊन गेले.
या प्रकारानंतर अंजुम यांनी दि. २३ रोजी रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.