म्हाडाच्या कार्यालयात महिलेने उधळले चक्क पैसे!
मुंबई : खरा पंचनामा
आपल्या हक्काचे घर असावे असे सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन म्हाडाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करीत असते. पण सर्वसामान्य नागरिकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाच्या कार्यालयात चक्क पैशांचा पाऊस पडला आहे. मुंबईतील म्हाडाच्या मुख्यालयात एका महिलेने अधिकाऱ्याच्य केबिनमध्ये पैसे उधळले आहेत.
मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात म्हाडाचे मुख्य कार्यालय आहे. या मुख्यालयात म्हाडाच्या मुंबई मंडळ, कोकण मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ अशी कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये दररोज विविध कामांसाठी नागरिक भेटी देत असतात. अशाच प्रकारे एक महिला शुक्रवारी (14 फेब्रुवारी) म्हाडाच्या कार्यालयात पोहोचली.
या म्हाडाच्या कार्यालयात पोहोचलेल्या या महिलेने आंदोलन करण्यास सुरुवात केली. आंदोलक महिला म्हाडाच्या एका अधिकाऱ्यांच्या कार्यालयात शिरली आणि जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यानंतर या महिलेने आपल्या बॅगेतील पैसे काढले आणि कार्यालयात उधळण्यास सुरुवात केली.
ज्या अधिकाऱ्याच्य केबिनमध्ये हा प्रकार घडला त्यावेळी संबंधित अधिकारी हे केबिनमध्ये उपस्थित नव्हते. त्यामुळे पैशांची उधळण केल्यावर या महिलेने केबिनच्या दरवाजाला पैशांचा हार घातला. हा प्रकार म्हाडाच्या सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ या महिलेला ताब्यात घेतले. तसेच म्हाडाच्या कार्यालयातून या महिलेला बाहेर काढले.
म्हाडाच्या कार्यालयात घडलेल्या या प्रकरणाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सुरुवातीला नेमकं काय घडत आहे हे कुणाच्याही लक्षात आले नाही. मात्र, महिलेकडून सुरू असलेल्या घोषणाबाजीने ती आंदोलन करत असल्याचं स्पष्ट झाले.
ही महिला नेमकी कोण आहे आणि तिने म्हाडाच्या कार्यालयात पैशांची उधळण का केली? तसेच म्हाडाच्या कार्यालयात ही महिला आंदोलन का करत होती? याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र, म्हाडाच्या कार्यालयात महिलेने केलेले आंदोलन आणि पैशांची उधळण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.