पोलिसांनीच केली नागपूरच्या सोने व्यापाऱ्यांची दीड कोटींची लूट!
अलिबाग : खरा पंचनामा
स्वस्त दरात सोने देतो, असे सांगून नागपूर आणि कामोठे येथील दोन सराफांची पोलिसांनी दीड कोटी रुपयांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यात घडला आहे. याप्रकरणी जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोन पोलिसांसह चारजणांना अटक केली असून त्यांच्याकडून दीड कोटींची रक्कम जप्त केली आहे. अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
समाधान पिंजारी, दीप गायकवाड, पोलीस अंमलदार समीर परशुराम म्हात्रे व विकी सुभाष साबळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर अन्य एक पोलीस कर्मचारी हनुमंत सुर्यवंशी सध्या फरार आहे. पोलिसांनीच 'फिल्मी स्टाईल'ने ही लूट केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मूळचा सांगली जिल्ह्यातील आटपाटी येथील रहिवासी असलेला समाधान पिंजारी (वय २०) याने त्याच्या गावातील सध्या नागपूर येथे सोने व्यापारी नामदेव हुलगे याला आपल्या ओळखीचा शंकर कुळे याच्याकडे ७ किलो सोने आहे, तो हे सोने कमी दराने विकणार आहे, असे सांगितले.
नामदेव हुलगे याने ही बाब कामोठे येथील त्यांचे नातेवाईक सराफ व्यावसायिक ओमकार वाकशे याला सांगितली. स्वस्त दराने सोने मिळत असल्याने काही सोने खरेदी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ५ कोटी जमणार नाही, जेवढे पैसे जमतील तेवढ्या पैशांचे सोने घेऊ असे हुलगे यांनी समाधानला कळवले. समाधान याने सांगितले की मी स्वतः १ कोटी रुपये जमवले आहेत. तुम्ही जास्तीत जास्त रक्कम घेऊन अलिबागला या, असे सांगितले.
ठरल्याप्रमाणे नामदेव हुलगे त्यांच्या दुकानात काम करणारे सहकारी नितीन पिंजारी याच्यासह ६५ लाख रुपये घेऊन कामोठे येथील ओमकार वाकशे यांच्याकडे आले. त्यादिवशी समाधान पिंजारी कामोठे येथे गेला. ओमकार वाकशे यांनी ८५ लाख रुपये जमा केले. नामदेव हुलगे व ओमकार वाकशे यांनी मिळून १ कोटी ५० लाख रुपये जमा केले. नंतर नामदेव हुलगे, समाधान पिंजारी, नितीन पिंजारी, नवनाथ पिंजारी हे तिघे १ कोटी ५० लाख रुपये घेऊन ओमकार वाकशे यांच्या गाडीतून अलिबागकडे निघाले. वाटेत त्यांनी गाडी बदलली.
ही गाडी अलिबाग तालुक्यातील तिनविरा धरणाजवळ आली असता समाधान पिंजारी याने गाडी थांबवली. त्याने नामदेव हुलगे व त्यांच्या सहकाऱ्यांना पुढे पोलीस चेकिंग असल्याचे सांगत, शंकर कुळे यास सोने घेवून तिनविरा येथे बोलावतो, असे सांगितले. दरम्यानच्या काळात चालक दीप गायकवाड याने त्यांची गाडी पनवेलच्या दिशेने वळवून ठेवली. थोड्याच वेळात पोलीस अंमलदार समीर परशुराम म्हात्रे, विकी सुभाष साबळे मोटारसायकलवरून तेथे आले.
त्यावेळी गाडीत बसलेला समाधान पिंजारी याने नमदेव हुलगे व त्याचे सहकारी यांना 'पोलीस आले आहेत, गाडीतून उतरा' असे सांगितले. त्यामुळे नामदेव व त्याचे सहकारी पैशांच्या बॅगा गाडीत ठेवूनच खाली उतरले. पोलीस अंमलदार गाडीजवळ गेले. त्यांनी नमदेव हुलगे व त्याच्या सहकाऱ्यांची तपासणी सुरु केली. याचवेळी दीप गायकवाड याने गाडी सुरु करून पनवेलच्या दिशेन सुसाट पळवली.
तिथे आलेले पोलीसही गाडीचा पाठलाग करण्याच्या बहाण्याने निघून गेले. काय घडतंय हे त्या दोन व्यापाऱ्यांना समजायला मार्ग नव्हता. यावेळी आरोपी समाधान याने सराफ व्यापारी नामदेव हुलगे यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. पोलीस तुम्हाला पकडतील, तुम्ही मोबाईल बंद करून निघून जा, असे सांगितले. त्यामुळे सोने घेण्यासाठी ओलेले व्यापारी कोमोठेकडे निघून गेले. ५ फेब्रुवारी रोजी पोलीस हवालदार हनुमंत सूर्यवंशी याने त्याच्या मोबाईलवरून नामदेव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु मोबाईल बंद असल्यामुळे त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर मिळवून त्याच्याशी संपर्क साधला.
'तुम्ही २ कोटी रुपये घेऊन गेले आहात. तुम्ही ताबडतोब पोलीस ठाण्यात या. नाही आलात तर तुमच्याविरोधात गुन्हा नोंदवून तुम्हाला अटक करू' अशी धमकी दिली. सूर्यवंशी याने केलेल्या कॉलमुळे नामदेव व त्यांच्या सहकाऱ्यांनी अलिबाग गाठले. पोलीस पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट भेटून घडलेली घटना सांगितली. त्यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना बोलावून या घटनेचा तापस करण्यास सांगितले.
याबाबात पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पथके नेमली. या पथकाने समाधान पिंजारी, दीप गायकवाड तसेच पोलीस अंमलदार समीर परशुराम म्हात्रे व विकी साबळे यांना अटक केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.