कोयना एक्सप्रेस दोन तास कराडमध्येच थांबून
प्रवाशांचे हाल, कारणाबाबत अस्पष्टता
कराड : खरा पंचनामा
मुंबईहून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला जाणारी कोयना एक्सप्रेस (गाडी क्र. ११०२९) गेल्या दोन तासांपासून कराड स्थानकावर थांबून आहे. बराच वेळ गाडी कराडमध्येच थांबल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. प्रवाशांनी याबाबत विचारणा केल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून मात्र कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याचे या गाडीतून प्रवास करणाऱ्यांनी खरा पंचनामाशी बोलताना सांगितले.
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी पावणेनऊ वाजता कोयना एक्सप्रेस कोल्हापूरसाठी निघते. सायंकाळी सहाच्या सुमारास ती कराड येथे तर रात्री सव्वा आठ वाजता कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे पोहोचते. सोमवारी सकाळी मुंबईतून निघालेली कोयना एक्सप्रेस सायंकाळी सहाच्या सुमारास कराड येथे पोहोचली. बराच वेळ झाला तरी गाडी जागची हलली नसल्याने प्रवाशांमध्ये चलबिचल निर्माण झाली. तासभर गाडी जागेवरच थांबून राहिल्याने काही प्रवाशांनी कराड येथील रेल्वे अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. मात्र त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले.
खरा पंचनामाच्या सूत्रांनी याबाबत चौकशी केल्यानंतर या गाडीचे इंजिन जाम झाल्याने गाडी कराड स्थानकावरच थांबल्याचे सांगण्यात आले. मिरजेहून दुसरे इंजिन मागवल्याचेही सांगण्यात आले. रात्री सव्वाआठच्या सुमारास मिरजेहून दुसरे इंजिन आल्यानंतर कोयना एक्सप्रेसचा सांगली, कोल्हापूरकडे प्रवास सुरू झाला. मात्र तब्बल दोन तास गाडी कराड स्थानकावर थांबल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.