विनोद गायकवाड यांना साहित्यिक द. का. हसमनीस पुरस्कार प्रदान
सांगली : खरा पंचनामा
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. विनोद गायकवाड यांना विटा येथील 43 व्या साहित्य संमेलनामध्ये साहित्यिक द. का. हसमनीस पुरस्कार प्रदान करण्यात आला. द. का. हसमनीस स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितांत हसमनीस यांच्यातर्फे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
मानपत्र, पाच हजार रुपये, शाल, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस म्हणाले की, योग्य माणसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा हा पहिलाच पुरस्कार तेवढ्याच तोलामोलाच्या साहित्यिकाला लाभतो, हा योग दुर्मिळ आहे. द. का. हसमनीस यांनी आपल्या लेखनाने कथा, कादंबरी, चित्रपटकथा, चित्रपट अशा विविध कला क्षेत्रात अमोल असे योगदान दिले आहे. डॉ . गायकवाड यांनीही कथा, कादंबरी, नाटक, समीक्षा, संशोधन, अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. ज्यांची पुस्तके सहा भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत असा या काळातील एकमेव साहित्यिक म्हणजे डॉ. गायकवाड.
सत्काराला उत्तर देताना गायकवाड म्हणाले, फार मोठ्या व्यक्तीच्या नावाचा हा पुरस्कार माझ्यावरील जबाबदारी वाढवणारा आहे. अत्यंत कृतज्ञतेने मी हा पुरस्कार स्वीकारतो. ग्रामीण साहित्याची एक मोठी पिढी द. का. हसमनीस यांनी घडवली. अनेक नामांकित लेखक त्यांनी घडवले. त्यांच्या नावाचा पुरस्कार हा माझा आजवरचा सर्वोच्च सन्मान आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील , संमेलनाचे संयोजक रघुनाथ मेटकरी , विश्वनाथ गायकवाड, पद्मश्री भाटिया, सौ. ललिता सबनीस, डॉ. ऋषिकेश मेटकरी, प्रा. श्रुती वडगबाळकर असे अनेक ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.