सांगलीत घरफोडी करणाऱ्या तरुणाला अटक
4.39 लाखांचा मुद्देमाल जप्त : एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील आरवाडे पार्क परिसरातील घर फोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केलेल्या तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ४ लाख ३९ हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
सौरभ महादेव पवार (वय २२, रा. पहिली गल्ली, राजीवनगर, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अफसाना इरशाद मुलाणी या आरवाडे पार्क येथे भाड्याने राहतात. दि. ४ रोजी सकाळी ११ ते दि. ६ रोजी सकाळी ९.३० या कालावधीत त्यांचे घर फोडून दागिने, रोकड लंपास करण्यात आली होती. चोरट्याने याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. यातील चोरट्याला पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले होते.
संजयनगर येथील मंगळवार बाजार येथील मनपाच्या गाळ्यानजीक एकजण चोरीचा ऐवज विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने परिसरात सापळा लावला होता. एकजण संशयिस्पदरित्या वावरताना निदर्शनास आला. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे दागिने तसेच रोकड आढळून आली. याबाबत विचारणा केली असता संशयिताने आरवाडे पार्क परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडील १ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि २ लाख ९४ हजार १०० रुपयांची रोकड असा ऐवज जप्त केला.
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरिक्षक कुमार पाटील, अतुल माने, सुशिल मस्के, रणजित जाधव, सुमित सुर्यवंशी, सुरज थोरात, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.