Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आमची इतकीच इज्जत का? चालकाने ५० रुपये दिल्याने चिडलेल्या वाहतूक पोलिसाचा प्रश्न

आमची इतकीच इज्जत का? 
चालकाने ५० रुपये दिल्याने चिडलेल्या वाहतूक पोलिसाचा प्रश्न

जळगाव : खरा पंचनामा

जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात एक वाहतूक पोलीस केळीने भरलेली मालमोटार अडवून चालकाकडे ५०० रुपयांची मागणी करत होता. परंतु, चालक ५० पेक्षा एक रुपया जास्त देण्यास तयार नव्हता. शेवटी पोलिसाने, आमची इतकीच इज्जत आहे का, असे म्हणत मिळालेले पैसे नाईलाजाने स्वीकारले.
मालमोटारीच्या चालकाने पोलिसाला अद्दल घडविण्यासाठी दोघांमधील संभाषणाची चित्रफीत घटनेला काही महिने झाल्यानंतर समाज माध्यमात टाकली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. जळगावच्या पोलीस अधीक्षकांनी सदर वाहतूक पोलिसाचे रविवारी निलंबन केले.

पाचोरा-चाळीसगाव रस्त्यावर नियमितपणे माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांना रस्त्यात अडविण्याचे आणि पोलिसांकडून पैशांची मागणी करण्याचे प्रकार कायम होत असतात. नेहमीच्या त्रासाला कंटाळलेल्या अशाच एका चालकाने पोलिसांकडून पैशांची मागणी करण्यात आल्यावर भ्रमणध्वनीद्वारे चित्रफीत तयार करण्याची शक्कल लढवली. वाहतूक पोलीस ५०० रुपयांची मागणी करत असताना, चालक ५० रुपये घेण्याची विनंती करत होता. घासाघीस करून शेवटी पोलीस १०० रुपयांवर आला, तरीही मालमोटारीचा चालक आम्ही तुम्हाला नेहमीच पैसे देतो, असे म्हणत फक्त ५० रुपये देण्यावर ठाम राहिला. त्यामुळे समोरचा वाहतूक पोलीस आमची ५० रुपयांएवढीच इज्जत आहे का, असे म्हणत चिडल्याचे चित्रफितीत दिसते.

दोघांमध्ये अहिराणी भाषेत झालेल्या संवादाची चित्रफीत तीन ते चार महिन्यांपूर्वी तयार करण्यात आली आहे. मात्र, ती आता समाज माध्यमात आल्यावर पोलिसांमध्ये खळबळ उडाली. प्रशासनाने संबंधित वाहतूक पोलिसाचे निलंबन केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.