'अंदर मारना या मरना'
वाल्मिक कराडवरील हल्ल्यानंतर बबन गीतेची पोस्ट
बीड : खरा पंचनामा
संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर आता सोशल मीडियावरुन खुलेआम इशारे दिले जात आहेत. विशेष म्हणजे बापू आंधळे खून प्रकरणातील फरार आरोपी शशिकांत ऊर्फ बबन गीते याने फेसबुक पोस्ट करून धगधगतं वक्तव्य केलं आहे. या प्रकारामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना तुरुंगात मारहाण झाली. याबाबत भाजप आमदार सुरेश धस यांनी माहिती दिली असून, त्यांनी मारहाण करणाऱ्यांची नावेही जाहीर केली. त्यांनी महादेव गिते आणि अक्षय आठवले यांच्यावर आरोप केला आहे.
या प्रकरणात विशेष लक्ष वेधून घेतले ते शशिकांत ऊर्फ बबन गीते याच्या फेसबुक पोस्टने. गीतेने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, 'अंदर मारना या मरना, सबकुछ माफ है' हा थेट इशारा असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. यातून त्याने कराडला लक्ष्य केल्याचं म्हटलं जातंय.
शशिकांत ऊर्फ बबन गीते हा बीड जिल्ह्यातील मरळवाडी गावचा बड्या राजकीय पार्श्वभूमीचा नेता आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चा उपाध्यक्ष होता. त्याच्यावर जून 2024 मध्ये बापू आंधळे या सरपंचाच्या खुनाचा आरोप आहे. आंधळे हे अजित पवार यांच्या गटाशी संबंधित होते. बापू आंधळे यांची हत्या राजकीय वर्चस्वातून झाल्याचा संशय आहे. या प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, त्यानंतर बबन गीते तब्बल 9 महिन्यांपासून फरार आहे.
वाल्मिक कराडवर तुरुंगात झालेल्या हल्ल्यापाठोपाठ बबन गीते याने सोशल मीडियावर उघडपणे केलेली धमकीखोर पोस्ट पाहता, बीड जिल्ह्यातील वातावरण पुन्हा अशांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाची आता जोरदार चर्चा महाराष्ट्रात रंगत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.