प्रशांत कोरटकरचा मुक्काम कळंबा जेलमध्ये
जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी
कोल्हापूर : खरा पंचनामा
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा प्रशांत मुरलीधर कोरटकर (रा. नागपूर) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी रविवारी (दि. ३०) त्याला कनिष्ठ स्तर १२ वे सह दिवाणी न्यायाधीश ए. ए. व्यास यांच्यासमोर व्हीसीद्वारे हजर केले. त्याच्या जामीन अर्जावर मंगळवारी (दि. १) सुनावणी होणार आहे. दरम्यान, जीविताला धोका असल्याने कोरटकरला कळंबा कारागृहातील स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आले.
संशयित आरोपी प्रशांत कोरटकर याच्या पोलिस कोठडीची मुदत रविवारी संपली. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्याची न्यायालयीन कामकाजासाठी उपस्थिती लावली. पुढील तपासासाठी पोलिस कोठडीची गरज नसल्याने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी व्हावी, असे म्हणणे पोलिसांनी मांडले. त्यानुसार न्यायाधीशांनी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी अॅड. प्रणील कालेकर यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला. त्यावर मंगळवारी पोलिसांसह सरकारी वकील आणि बचाव पक्षाच्या वकिलांनी म्हणणे मांडावे, असे निर्देश न्यायाधीशांनी दिले. यावेळी सरकारी वकील सूर्यकांत पवार, फिर्यादी इंद्रजित सावंत यांच्यासह दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, आदी शिवप्रेमी उपस्थित होते. सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा न्यायालयाच्या आवारात उपस्थित होता. अॅड. घाग, अॅड. असीम सरोदे आणि तपास अधिकारी संजीव झाडे यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली.
संशयित कोरटकर याच्यावर कारागृहात हल्ला होऊ शकतो. त्यामुळे त्याला कारागृहात स्वतंत्र आणि सुरक्षित कोठडी मिळावी, अशी मागणी अॅड. घाग यांनी केली. या मागणीला न्यायाधीशांनी सहमती दिली.
गेल्या आठवड्यात दोन वेळा सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहिलेल्या कोरटकरवर शिवप्रेमींनी हल्ल्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा तशी घटना घडू नये यासाठी पोलिसांनी रविवारी त्याला सुनावणीसाठी ऑनलाईन हजर केले. तत्पूर्वी पहाटे सीपीआरमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी केली. ऑनलाईन उपस्थितीमुळे पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी झाला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.