मंत्रालयात आता 'डिजीप्रवेश अॅप'वरूनच मिळणार 'एन्ट्री'
मुंबई : खरा पंचनामा
मंत्रालयात सुरक्षिततेला प्राधान्य देत 'मंत्रालय सुरक्षा प्रकल्प' राबवला जात आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात चेहरा ओळख प्रणाली कार्यान्वित झाली असून, दुसऱ्या टप्प्यात 'व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम' विकसित करण्यात आली आहे. यापुढे मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना प्रवेशासाठी 'डिजीप्रवेश' या ऑनलाइन अॅपचा वापर करावा लागणार आहे.
अभ्यागतांना फक्त ज्या विभागात काम आहे, तिथेच आणि ठरलेल्या वेळेतच प्रवेश मिळेल. अनधिकृत मजल्यावर गेल्यास कारवाईला सामोरं जावं लागेल. काम संपल्यानंतर अभ्यागतांनी निर्धारित वेळेत मंत्रालय सोडणं बंधनकारक आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना रांगेत ताटकळत उभं राहण्याची गरज भासू नये, यासाठी त्यांना दुपारी 12 वाजता प्रवेश दिला जाईल. तसेच, दुपारी 12 नंतर त्यांच्यासाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था असेल. यासाठी त्यांनी वैध प्रमाणपत्र सोबत ठेवणं आवश्यक आहे.
सर्व अभ्यागतांना दुपारी 2 नंतरच मंत्रालयात प्रवेश मिळेल. यासाठी 'डिजीप्रवेश' अॅपद्वारे प्रवेशपास घ्यावा लागेल. प्रवेशासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड यापैकी कोणतंही शासकीय ओळखपत्र दाखवावं लागेल. अशिक्षित किंवा स्मार्टफोन नसलेल्या अभ्यागतांसाठी गार्डन गेटवर एक खिडकी उपलब्ध असेल, जिथे ऑनलाइन नोंदणी आणि मदत मिळेल.
'डिजीप्रवेश' अॅपवर नोंदणी केल्यानंतर मिळणाऱ्या QR कोडच्या आधारे मंत्रालयाबाहेरील खिडकीवर RFID कार्ड मिळेल. या कार्डाद्वारे सुरक्षातपासणीनंतर प्रवेश मिळेल. अभ्यागतांनी हे RFID ओळखपत्र परिधान करणं आणि बाहेर पडताना ते सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे जमा करणं अनिवार्य आहे.
'डिजीप्रवेश' अॅप Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. Android साठी Play Store वर आणि iOS साठी Apple Store वर 'digi pravesh' सर्च करून हे अॅप मोफत डाउनलोड करता येईल. पहिल्यांदा एकदाच नोंदणी करावी लागेल. आधार क्रमांकावर आधारित छायाचित्र ओळख पटल्यानंतर नोंदणी पूर्ण होईल. त्यानंतर ज्या विभागात काम आहे, तो स्लॉट बुक करून रांगेत न थांबता प्रवेश मिळेल. ही प्रक्रिया अवघ्या तीन मिनिटांपेक्षा कमी वेळात पूर्ण होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.