Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपायला हवे! इम्रान प्रतापगढींविरोधातील गुन्हा रद्द

अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपायला हवे! 
इम्रान प्रतापगढींविरोधातील गुन्हा रद्द



नवी दिल्ली : खरा पंचनामा

"काव्य, चित्रपट, उपरोध आणि कला-साहित्य मानवी जीवन अधिक अर्थपूर्ण बनविते. पण एखाद्या टीकेमुळे सत्तेला किंवा पदाला धोका संभवतो असा समज करुन घेणाऱ्या लोकांना शब्दांची परिणामकारकता ठरवता येणार नाही.

व्यक्त होणारी मते न्यायालयांना आवडणारी नसली तरी अभिव्यक्तीचा अधिकार जपायलाच हवा आणि पोलिसांनीही राज्यघटनेचे पालन करून आदर्शाचा आदर केला पाहिजे," असे मत नोंदवीत आज सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी यांच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा रद्द केला.

'ऐ खून के प्यासे बात सुनो' या कवितेसह प्रतापगढी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओवरुन गुजरात पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १९६ अंतर्गत प्रतापगढी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

त्याविरुद्ध प्रतापगढी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. प्रतापगढी यांच्याविरुद्ध गुन्हा रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक आणि न्या. उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रतिष्ठेचे जीवन जगण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आवश्यक आहे. साहित्य आणि कला जीवनाला अधिक अर्थपूर्ण करते. विचारांची मुक्त अभिव्यक्ती आणि वैयक्तिक किंवा समूहांची मते निरोगी आणि सभ्य समाजाचे अविभाज्य अंग आहे. त्यावाचून राज्यघटनेतील २१ व्या कलमाने दिलेल्या प्रतिष्ठेने जगण्याच्या हमीचे पालन होणे शक्य नाही.

निकोप लोकशाहीत व्यक्ती किंवा समूहाने व्यक्त केलेल्या मतांचे प्रत्युत्तर विचारांनीच दिले पाहिजे. एखाद्याने व्यक्त केलेली मते बहुसंख्य लोकांना आवडत नसली तरी त्या व्यक्तीच्या विचार स्वातंत्र्याचे रक्षण आणि आदर करायलाच हवे. बोललेले किंवा लिहिलेले शब्द आम्हा न्यायाधीशांना अनेकदा आवडणार नाहीत. पण राज्यघटनेच्या कलम १९ (१) ने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करणे आमचे कर्तव्य आहे.

घटनापीठांनी हे कर्तव्य पुढे सरसावून बजावले पाहिजे. नागरिकांच्या टीकात्मक मतप्रदर्शनाच्या अधिकारांचे रक्षण करणे पोलिस आणि न्यायालयांचे कर्तव्य आहे. एखाद्याने व्यक्त केलेली मते बहुसंख्य लोकांना आवडत नसली तरी त्या व्यक्तीच्या विचार स्वातंत्र्याचे रक्षण आणि आदर करायलाच हवे, असे मत न्या. ओक आणि न्या. भुयान यांनी व्यक्त केले.

प्रतापगढी यांच्या कवितेमुळे कोणत्याही प्रकारचा द्वेष अथवा वितुष्ट निर्माण होत नाही उलट त्यामुळे लोकांना हिंसा करण्यापासून रोखले जाते. अन्यायाला देखील प्रेमाने कसे सामोरे जायचे हे त्यातून कळते असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले. सत्ताधाऱ्यांनी केलेल्या अन्यायाला आव्हान देण्याचे काम प्रतापगढी यांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे शांतता आणि सौहार्द धोक्यात येऊ शकतो असे म्हणणे देखील चुकीचे ठरेल असेही न्यायालयाने नमूद केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.