कवठेमहांकाळमध्ये महिलेचा गळा आवळून खून
दोन दिवसांनी घटना उघडकीस : अनैतिक संबंधातून खून केल्याची शक्यता
सांगली : खरा पंचनामा
कवठेमहांकाळ शहरातील बेघर वसाहत, धुळगाव रोड परिसरात राहणाऱ्या महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांसह एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. संशयिताच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके पाठवण्यात आल्याचे एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी सांगितले. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शानाबाई उर्फ शालन शंकर जाधव, वय 60, मूळ रा. कोकळे, सध्या रा. कवठेमहांकाळ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मृत शालन यांचा सैन्य दलातील शंकर जाधव यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना दोन मुले, एक मुलगी आहे. तीनही मुलांचे विवाह झाले आहेत. शंकर यांच्या मृत्यूनंतर शालन कवठेमहांकाळ येथील बेघर वसाहत, धुळगाव रोड परिसरात भाड्याच्या घरात रहात होत्या. त्यांची दोन्ही मुले कामानिमित्त बाहेरगावी राहतात तर मुलगी पतीच्या घरी राहते.
रविवारी रात्री आठच्या सुमारास त्यांना शेजाऱ्यांनी पाहिले होते. त्यानंतर त्या दिसल्या नव्हत्या. त्यांच्या घराला कुलूप होते. आज बुधवारी सायंकाळी त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजारच्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केल्यावर शालन यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह सडल्याने पंचनामा करून तो ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला.
घटनास्थळी जतचे पोलीस उपाधीक्षक सुनिल साळुंखे, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, कवठेमहंकाळचे पोलीस निरीक्षक जोतिराम पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मृत शालन यांच्या घराला बाहेरून कुलूप लावल्याने त्यांच्या परिचयतील व्यक्तीने हा खून केल्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस युद्धपातळीवर संशयिताचा शोध घेत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.