"शिवसेना-मनसे युतीबाबत कोणीही बोलू नये"
मुंबई : खरा पंचनामा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच्या संभाव्य युतीसंदर्भात पक्षातील कोणत्याही नेत्याने भाष्य करू नये. परदेशातून आल्यानंतर युतीसंदर्भात मी स्वतःच भूमिका मांडेन, तोपर्यंत कुणीही माध्यमांकडे, सोशल मीडियात बोलू नये, अशा सूचना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांच्यासह मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे, ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन, मनसे चित्रपटसेनेचे प्रमुख अमेय खोपकर, यशवंत किल्लेदार आदी नेत्यांनी जुने मुद्दे उकरून काढत संभाव्य युतीसंदर्भात नकारात्मक सूर लावला होता. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी पक्षातील सर्वच नेत्यांना तंबी दिली आहे.
महाराष्ट्रहितासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यास सकारात्मकता दाखवली आहे. शिवसेना-मनसेच्या या संभाव्य युतीसंदर्भातून मराठी लोकांमधून मोठ्या प्रमाणात स्वागत केले जात आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, मनसेच्या काही नेत्यांनी जुने मुद्दे उकरून काढत आताच अटी-शर्ती घालू लागले तर युती कशी पुढे जाईल, असं म्हंटल होतं.
तर दुसरीकडे मनसेतील बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, अभिजीत पानसे यांच्यासह अनेक नेत्यांची ठाकरे बंधूंनी एकत्र आले पाहिजे, अशी भूमिका आहे. त्यामुळे संभाव्य युतीसंदर्भात आपल्या पक्षातील नेत्यांकडून मिठाचा खडा पडू नये यासाठी राज ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांना तंबी दिली आहे.
राज ठाकरे सध्या परदेशात गेले आहेत. त्यापूर्वी त्यांनी रविवारी रात्री पक्षातील प्रमुख नेत्यांना फोन करून यावर सध्या कोणीही युतीसंदर्भात भाष्य करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच उद्धव ठाकरेही विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे युतीच्या चर्चा विदेशात होणार का? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.