पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू
शाहजहांपूर : खरा पंचनामा
उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर येथे झालेल्या एका विचित्र अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. येथील पोलीस तपासणी नाक्यावर पोलीस उप निरीक्षकाने दुचाकीस्वाराला रोखण्यासाठी त्याच्या दुचाकीवर काठी मारली.
मात्र त्यामुळे दुचाकीच्या मागच्या सीटवर बसलेली महिला तोल जाऊन खाली पडली. तसेच त्याचवेळी तिथून जात असलेल्या डंपरखाली सापडून या महिलेचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे स्थानिक रहिवाशी संतप्त झाले असून, त्यांनी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केला. त्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा नोंदण्यात आला आहे. हा अपघात रविवारी निरोही येथील धुलिया मोड येथे वाहन तपासणी सुरू असताना झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी दिली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार कल्याणपूर येथील प्रदीप हे त्यांची पत्नी अमरावती हिच्यासोबत एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जात होते. त्याचवेळी तपासणी नाक्यावर असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने त्यांच्या दुचाकीवर काठी मारली. त्यामुळे तोल जाऊन अमरावती ह्या दुचाकीवरून खाली पडल्या. तसेच मागून येणाऱ्या डंपरखाली सापडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिक नागरिकांना रास्ता रोको करून वाहतूक बंद पाडली. अखेरीस पोलीस आणि प्रशासनाने हस्तक्षेप केल्यानंतर ग्रामस्थांनी रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास रास्ता रोको मागे घेतला. आता पोलीस अधीक्षक (शहर) देवेंद्र कुमार यांनी प्रकरणाच्या पुढील तपासाचे आदेश दिले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.