दोन लाखांची लाच घेताना पीएसआयला रंगेहात अटक
पलूसमध्ये सांगली लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
गुन्हा दाखल करण्याची भिती घालून एका ट्रेडिंग व्यावसायिकाकडून २ लाखाची लाच घेताना पलूस येथील पोलीस उपनिरिक्षकास रंगेहात पकडण्यात आले. सांगली लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी ही कारवाई केल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील यांनी दिली. याबाबत पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यत सुरु होते.
महेश बाळासाहेब गायकवाड (वय ३६, रा. प्रथमेश अपार्टमेंट, फ्लॅट क्र. ४०३, तासगाव - कराड रस्ता, पलूस ) असे संशयित पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक असून त्यांचा फोरेक्स ट्रेडिंगचा देखील व्यवसाय आहे. दि. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांच्यावर पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलीस उपनिरिक्षक महेश गायकवाड याने तक्रारदार यांना दि. ४ जानेवारी २०२५ रोजी पलूस येथून ताब्यात घेतले होते. त्याला अटकेची भिती दाखवून त्यांच्याकडे १० लाखाची मागणी केली. तसेच त्याच दिवशी तक्रारदाराकडून २ लाख रुपये घेतले. यावेळी गायकवाड याने अटकपूर्व जामीन करुन घ्या असे सांगून तक्रारदारांना सोडून दिले. उच्च न्यायालयातून तक्रारदार यांना जामिन मंजूर झाला.
त्यानंतर तक्रारदार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून उर्वरित ८ लाखाची मागणी करण्यात आली. दि. २५ मार्च रोजी तक्रारदार यांना पोलीस ठाण्यात बोलवून शिल्लक राहिलेल्या पैशाची व्यवस्था कर अन्यथा तुझी चारचाकी जप्त करेन तसेच ट्रेडिंग अनुषंगाने सुरु असलेल्या चौकशीत तुझ्यावर आणखी एक गुन्हा दाखल करेन अशी भिती तक्रारदार यांना घातली. दि. २ एप्रिल रोजी पलूस पोलीस ठाणे परिसरात लाचलुचपत प्रतिबंक विभागाने सापळा लावला. यावेळी तक्रारीची पडताळणी केली असता गायकवाड याने तडजोडीअंती २ लाखाची तक्रारदार यांच्याकडे मागणी करुन २ लाख रुपये स्विकारताना रंगेहात पकडले.
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरिक्षक विनायक भिलारे आणि किशोर कुमार खाडे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.