सांगलीत सकल जैन समाजातर्फे गुरुवारी आक्रोश मोर्चा
मुंबईतील मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ आयोजन : भालचंद्र पाटील, रावसाहेब पाटील
सांगली : खरा पंचनामा
विले-पार्ले पूर्व मुंबई येथील जैन मंदिर मुंबई महापालिका प्रशासनाने बुलडोझर लावून उध्वस्त केले. देशभर व विशेषकरून महाराष्ट्रातील जैन समाजात संतापाची लाट उसळली आहे. जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. याचे तीव्र पडसाद समस्त जैन व अहिंसाप्रेमी समाजात उमटले आहेत. शासनाला याचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी गुरुवार दि. २४ एप्रिल रोजी सकल जैन समाज सांगली यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले तीर्थंकर हे जगा आणि जगू द्या या संदेशाचे नायक आहेत. त्यांच्या उपदेशाने देशात शांती, सहिष्णुतेचा महामार्ग प्रशस्त झाला आहे. स्वातंत्र व लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या तीर्थंकरांचे मंदिर उध्वस्त करुन महापालिका प्रशासनाने संविधानाने दिलेल्या उपासनेच्या जैन समाजाच्या हक्कावर गदा आणली हे शासनास व महापालिका प्रशासनास शोभनीय व समर्थनीय नाही.
दि. १९ एप्रिल रोजी सांगलीत जैन बोर्डिंग मध्ये सांगलीतील सकल जैन समाजाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत जैन मंदिर पाडल्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला. जैन मंदिर होते त्या ठिकाणी पूर्ववत महापालिका प्रशासनाने बांधून द्यावे व याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करुन कारवाई करावी अशी समाजाच्या वतीने मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
रावसाहेब पाटील म्हणाले, आक्रोश मोर्चा विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून सकाळी ९ वाजता सुरु होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
या मोर्चामध्ये सर्व जैन समाजासह दिगंबर, श्वेतांबर, तेरापंथी, स्थानकवासी, मूर्तीपूजक समाज सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील खासदार व आमदार यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींना जैन समाजावर होत असलेल्या अन्यायाचे गांभीर्य राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या लक्षात आणून द्यावे आणि या आक्रोश मोर्चेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, रोहन मेहता, जतीन शहा, महावीर बनसाली, साईल शहा, जयेश जैन, जयेश हरिया आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.