कवठेमहांकाळमधील त्या महिलेच्या खुनप्रकरणी बाजच्या तरुणास अटक
अनैतिक संबंधाच्या वादातून खून केल्याची कबुली : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
कवठेमहांकाळ शहरातील बेघर वसाहत, धुळगाव रोड परिसरात राहणाऱ्या महिलेचा अनैतिक संबंधाच्या वादातून गळा आवळून खून केल्याप्रकरणी बाज (ता. जत) येथील तरुणाला मालगाव (ता. मिरज) येथून अटक करण्यात आली आहे. त्याने खून केल्याची कबुली दिली आहे. बुधवारी ही घटना उघडकीस आली होती. पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत संशयिताला अटक केल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
किरण आकाराम गडदे (वय २०, रा. बाज, ता. जत) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर शानाबाई शंकर जाधव, वय 60, मूळ रा. कोकळे, सध्या रा. कवठेमहांकाळ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मृत शानाबाई यांचा सैन्य दलातील शंकर जाधव यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना दोन मुले, एक मुलगी आहे. तीनही मुलांचे विवाह झाले आहेत. शंकर यांच्या मृत्यूनंतर शानाबाई कवठेमहांकाळ येथील बेघर वसाहत, धुळगाव रोड परिसरात भाड्याच्या घरात रहात होत्या. त्यांची दोन्ही मुले कामानिमित्त बाहेरगावी राहतात तर मुलगी पतीच्या घरी राहते.
रविवारी रात्री आठच्या सुमारास त्यांना शेजाऱ्यांनी पाहिले होते. त्यानंतर त्या दिसल्या नव्हत्या. त्यांच्या घराला कुलूप होते. बुधवारी त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले.
घटनेनंतर पोलिसांसमोर संशयिताला पकडण्याचे आवाहन होते. शेजाऱ्यांनी कोणालाही पाहिले नव्हते. शानाबाई यांच्या मोबाईल कॉल डिटेल्सवरूनही संशयित सापडत नव्हता. पोलिसांनी तांत्रिक तपास केल्यावर गडदे याच्यावरील संशय बळावला. संश्यावरुन त्याला मालगाव (ता. मिरज) येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने अनैतिक संबंधाच्या वादातून ओढणीने गळा आवळून शानाबाई यांचा खून केल्याची कबुली दिली. त्याला अटक करून कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त अधीक्षक रितू खोकर, जतचे पोलीस उपाधीक्षक सुनिल साळुंखे, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, कवठेमहंकाळचे पोलीस निरीक्षक जोतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक, पंकज पवार, अनिल ऐनापुरे, अनिल कोळेकर, सागर लवटे, नागेश खरात, अमर नरळे, महादेव नागणे, संदिप गुरव, सतिश माने, मछिंद्र बर्डे, संदिप नलावडे, सोमनाथ गुंडे, उदय माळी, केरबा चव्हाण, सुनिल जाधव, अभिजित माळकर, विक्रम खोत, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.