Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या डॅशबोर्डचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या डॅशबोर्डचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांचा अद्ययावत तपशील एका ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने "डॅशबोर्ड" विकसित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले.
याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव संतोष खोरगडे उपस्थित होते. तर सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, या डॅशबोर्डमध्ये विद्यापीठांशी संबंधित प्रवेशप्रक्रिया, निकाल, शिष्यवृत्ती, 
वसतिगृहे, शुल्क आणि महाविद्यालयांशी संबंधित संलग्नता व शैक्षणिक सुविधा तसेच सार्वजनिक ग्रंथालय यांची माहिती समाविष्ट आहे. या डॅशबोर्डवर 26 सार्वजनिक विद्यापीठे व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा समावेश असून भविष्यात राज्यातील सर्व खासगी व सार्वजनिक विद्यापीठांचा समावेश डॅशबोर्डमध्ये करण्यात येणार आहे. हा डॅशबोर्ड उच्च व तंत्र शिक्षण विभागाबरोबरच सर्वसामान्य जनतेसाठीही उपलब्ध आहे.

या डॅशबोर्डमधील माहितीचे विश्लेषण करून शैक्षणिक विषयांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यास तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोलाची मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना व पालकांना त्यांच्या शैक्षणिक बाबींकरिता खात्रीशीर अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे. या माहितीच्या विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे नियोजित असल्याची माहिती मंत्री श्री. पाटील यांनी दिली.
डॅशबोर्डवरील अधिक माहिती https://dashboardhtedu.maharashtra.gov.in/home उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.