Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्य कायद्याने चालते की दमदाटीने?

राज्य कायद्याने चालते की दमदाटीने?

मुंबई : खरा पंचनामा

नवी मुंबईतील एका भूखंडावर बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या बांधकामावर कारवाई करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याची तयारी सुरू केली तेव्हा बोकडवीरा गावाच्या सरपंचांनी आपल्याला धमकी दिल्याचे यासंदर्भातील सरकारची यंत्रणा सिडकोने न्यायालयाला सांगितले. त्यावर उच्च न्यायालयाने सिडकोला फटकारले. तसेच राज्यात कायदा चालतो की दमदाटी असा सवालही केला.

न्या. ए.एस. गडकरी आणि न्या. कमल यांच्या खंडपीठाने या महिन्याच्या सुरुवातीला या संदर्भात एक आदेश दिला होता. या बेकायदेशीर बांधकामाविरोधात कारवाई करण्यास सिडको अधिकारी इच्छुक नसल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले होते.

अधिकाऱ्यांची कारवाई करण्याची मानसिकता दिसत नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले होते. आपले कायदेशीर कर्तव्य पार पाडताना अधिकारी पुरेसे पोलीस संरक्षण घेऊ शकतात. अशा कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त घेण्याचा अधिकाऱ्यांना अधिकार आहे. बेकायदा गोष्टी रोखणे आणि कायद्याचे राज्य स्थापन करणे हे सरकारी अधिकाऱ्यांचे कर्तव्यच आहे, अशा शब्दांत खंडपीठाने सिडकोच्या अधिकाऱ्यांचे कान उपटले. इथे कायद्याचे राज्य आहे की दमदाटीचे हेच आम्हाला कळत नाही, असेही खंडपीठ म्हणाले.

प्रशासनाने या बेकायदा बांधकामावर कारवाईचा प्रयत्न केला, त्यावेळी बोकडवीरा गावच्या सरपंचांनी अधिकाऱ्यांना धमकी दिली, असे सिडकोने न्यायालयाला सांगितले. सरपंचांच्या धमकीमुळे कारवाई करू न शकलेल्या सिडकोला न्यायालयाने यावेळी फटकारले. बोकडवीरा गावच्या सरपंचाच्या धमक्या लोकशाहीप्रधान देशात खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे खंडपीठाने सुनावणीवेळी बजावले. 2016 मध्ये एका दांपत्याने दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठापुढे सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या जमिनीवर दीपक पाटील नावाच्या एका व्यक्तीने बेकायदेशीर बांधकाम केले आहे. त्या बांधकामावर कारवाईचे करण्याचे निर्देश देण्याची मागणी याचिकेतून केली आहे. या जागेतील काही जागेवर पाटील यांनी बेकायदेशीररित्या दुकाने बांधली आहेत. याचिकाकर्त्यांच्या जागेवरील बेकायदेशीर बांधकाम हटवण्यासाठी आठवड्याभरात आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश सिडकोला दिले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.