UPSC परीक्षेत कोल्हापूरचे मोठे यश, चौघांनी मिळवली 'इतकी' रँक?
कोल्हापूर : खरा पंचनामा
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या नागरी सेवा परीक्षेत जयसिंगपूरमधील आदिती संजय चौगुले यांनी ६३ वी, यमगे (ता. कागल) येथील बिरदेव सिद्धाप्पा डोणे यांनी ५५१ वी, तर बालिंगेतील हेमराज हिंदूराव पणोरेकर यांनी ९२२ रँक मिळवली.
मेंढपाळाचा मुलगा असलेल्या बिरदेव यांनी अधिकारी पदाचे स्वप्न साकार केले. आदिती यांनी २०२३ ला ४३३, तर यंदा ६३ वी रँक खेचून आणत त्यांच्यातील गुणवत्तेची चुणूक दाखवली. प्रि-आयएएस ट्रेंनिगमधील ऋषीकेश वीर (मुंबई) यांनी ५५६ व रोहन पिंगळे (पुणे) यांनी ५८१ वी रँक मिळवली. आयोगातर्फे गतवर्षी जूनमध्ये पूर्व, तर सप्टेंबरमध्ये मुख्य परीक्षा झाली होती.
पूर्व परीक्षेला १३ लाख ४ हजार परीक्षार्थी बसले होते. त्यात उत्तीर्ण झालेले १४ हजार ६२७ परीक्षार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यातील दोन हजार ८४५ जणांनी उत्तीर्ण होऊन मुलाखत दिली. परीक्षा एकूण एक हजार ५६ पदांसाठी झाली होती. परीक्षेचा निकाल आज होताच, यशस्वी ठरलेल्या परीक्षार्थीचे कुटुंबासह मित्र परिवारातून अभिनंदन झाले.
यमगेच्या बिरदेव यांचे शिक्षण सातवीपर्यंतचे केंद्रीय शाळा, तर दहावीपर्यंतचे जय महाराष्ट्र हायस्कूलमधून झाले. दहावीत ९६ टक्के गुण मिळविल्यानंतर त्यांनी मुरगूडच्या शिवराज कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेतला. बारावीत ८९ टक्के गुण मिळविल्यानंतर त्यांनी पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून बी. टेक. पूर्ण केले. नागरी सेवेच्या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले. दुसऱ्या प्रयत्नात मुख्य परीक्षेत ते यश मिळवू शकले नाहीत. तिसऱ्या प्रयत्नात मात्र पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी अधिकारी पदाचे स्वप्न पूर्ण केले.
हेमराज यांचे प्राथमिक शिक्षण रा. ना. सामाणी विद्यालयातून झाले. कागल येथील नवोदय विद्यालयातून त्यांनी दहावीला ८०, तर बारावीला ७० टक्के गुण मिळविले. त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून समाजशास्त्र विषयातून पदवी घेतली व २०२० पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्यांनी चौथ्या प्रयत्नात यश मिळविले. विशेष म्हणजे त्यांनी कोल्हापुरात राहूनच अभ्यास केला. त्याला विद्या प्रबोधिनीकडून शिष्यवृत्ती मिळत होती. त्यांचे वडील सेवानिवृत्त लिपिक असून, आई संगीता गृहिणी आहेत. त्यांना राजकुमार पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.
आदितीने यांनी २०२३ च्या परीक्षेत ४३३ वा रँक मिळवला होता. त्या इंडियन डिफेन्स अकाऊंटंट सेवेत रुजू झाल्या होत्या. आता त्रेसष्टावी रँक असल्याने जिल्हाधिकारी पदाचे स्वप्न साकार होईल, असे त्यांनी सांगितले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जयसिंगपुरातील मालू हायस्कूल, तर उच्च माध्यमिक शिक्षण जनतारा ज्युनिअर कॉलेजमधून झाले. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेऊन त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. दरम्यान, त्या समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी घेऊन नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या. दत्त साखर कारखान्याचे मुख्य अभियंता संजय चौगुले यांची त्या कन्या आहेत. मुंबईचे ऋषीकेश बीई इलेक्ट्रॉनिक्स असून, त्यांनी चौथ्या प्रयत्नात यश मिळवले. त्यांचे आई-वडील शासकीय सेवेत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.